पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांना प्राईडतर्फे मदत

। महाड । प्रतिनिधी ।
कोरोना महामारी मध्ये जगभरात अनेक लहान मुलांनी आपले पालकत्व गमावले आहे. महाड तालुक्यात देखील पालक गमावलेल्या मुलांसाठी प्राईड इंडिया संस्थेने शैक्षणिक मदतीचा हात पुढे गेला आहे.
संस्थेने तालुक्यातील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीचा हात पुढे केला आहे. गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, स्वच्छता साहित्य, देखील वाटप करण्यात आले. 12 कुटुंबांतील मुलांना शिक्षण व आरोग्य खर्चासाठी प्रत्येकी तीस हजार रुपये चा धनादेश देऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला. सक्षम प्रकल्पांतर्गत महाड तालुक्यातील 43, पोलादपूर 12, माणगाव 29, पाली 14, अशा एकूण 98 विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत आहे. यासाठी रिया व नील यांच्या नॉरवेस्ट या संस्थेमार्फत 60 विद्यार्थी व महानगर गॅस निगम लिमिटेड यांच्यामार्फत 38 विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. शैक्षणिक साहित्य, जादा क्लासेस, संगणक अभ्यास, शालेय गणवेश, आरोग्य इत्यादींचा खर्च यातून पूर्ण केला जात आहे. 0 ते 5 वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहार व सर्व कुटुंबांना दर महिन्याला किराणा साहित्य, लघु उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य देखील केले जात आहे. संस्थेच्या मानद संचालिका ईषाताई मेहरा, संस्थेच्या सीईओ मोरे , यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक धामणस्कर, भोईर, गायकवाड, प्रभाकर सावंत, प्रभाकर गोरुले आदींनी या साठी मेहनत घेतली.

Exit mobile version