। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्यातील जैन मंदिरातील पुजाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. नागोठणे बाजार पेठेतील आराधना भवन या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये बेड शीटच्या सहाय्याने सीलिंग फॅनला गळफास घेऊन मयुरकुमार महेशभाई राठवा (23) नावाच्या या पुजाऱ्याने आपली जीवन यात्रा संपविली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागोठण्यातील जैन मंदिरातील मुख्य पुजारी काही दिवसांपूर्वी गावी गेल्याने सध्या त्याच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात बदली पुजारी म्हणून साधारण पंधरा दिवसांपूर्वी हा पुजारी जैन मंदिरात नित्य पूजाविधी करण्यासाठी आलेला होता. गुजरात राज्यातील रा. वालपरी, पो. माकणी, ता. बोरडिली, जि. छोटा उदयपूर येथील मूळ रहिवासी असलेला हा पुजारी सध्या आराधना भवन येथील तिसऱ्या माळ्यावरील एका खोलीत त्याची पत्नी पिंपकलबेन राठवा (24) हिच्यासह राहत होता. नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण उरकल्यानंतर हा पुजारी तिसऱ्या माळ्यावर गेला आणि त्याने आत्महत्या केली. त्यानंतर काही वेळातच पंख्याला लटकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. सुमारे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या या तरुण पुजाऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेने नागोठण्यात खळबळ उडाली आहे. या पुजाऱ्याची पत्नी पिंपकलबेन मयुरकुमार राठवा हिने दिलेल्या तक्रारीनुसार या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. पुजाऱ्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्यातील पो.हवा. महेश रुईकर अधिक तपास करीत आहेत.






