ज्येष्ठांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्यः चित्रा पाटील

| भाकरवड | वार्ताहर |

ज्येष्ठांना कोणत्याही अडीअडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही झेप फाऊंडेशनच्या अध्यक्ष चित्रा पाटील यांनी दिली. अलिबाग तालुक्यातील पोयनाड विभाग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने 16 वा वर्धापनदिन रविवारी (दि.11) पोयनाड आठवडा बाजार येथील भव्य सभागृहात पार पडला. त्यावेळी प्रमख अतिथी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनदी लेखापाल संजय राऊत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, चित्रा पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटना शाखा पोयनाडचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष अरुण राऊत, सचिव दामोदर पाटील, सहसचिव मधुकर राऊत, खजिनदार अनिल पाटील, तर कुर्डूस ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यशवंत पाटील, बबन पिंगळे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, गणेशपूजन, दीप प्रज्ज्वलन, स्वागत समारंभ, तर स्वर्गवासी झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. दरम्यान, विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या मान्यवर सभासदांचा सपत्नीक सत्कार, वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार, फेब्रुवारी 2024 महिन्यात वाढदिवस असल्याने सभासदांचे शुभचिंतन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पायल देशमुख, मानसी म्हात्रे, स्वप्नील जाधव, सही पाटील, दर्पण पाटील, स्वरा भगत, तर कर्तव्यपथ दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या संचलनामध्ये सहभाग घेणारा स्मित म्हात्रे, देवश्री टेमकर, अमरनाथ राऊत गुरुजी, आंतरराष्ट्रीय दर्पणकार बाळशास्त्री जांबेकर पुरस्कार प्राप्त राजन पांचाळ आदींचा समावेश होता.

यावेळी चित्रा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांचे विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वजण एकत्र आले पाहिजे, शासकीय, निमशासकीय सुविधांचा योग्य तो फायदा करून घेतला पाहिजे, आपल्यामधील मतभेद दूर ठेवून एकोप्याने सर्वांच्या सुखदुःखात सामील झाले पाहिजे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, जसे आपण रिटन टॅक्स सरकारला भरतो, त्याच पद्धतीने आपण आईवडील यांची सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद हीच आपली कमावलेली पुंजी असेल. ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना सढळ हस्ते मदत करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

कार्यक्रमासाठी ज्येष्ठ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दामोदर पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अरुण राऊत यांच्यासह सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

Exit mobile version