दरडग्रस्त केवनाळेच्या पुनर्वसनाला प्राधान्य

प्रांधाधिकारी प्रतिमा पुदलवाड यांची माहिती
जिऑलॉजिक सर्व्हेनुसार वर्ग 1 समावेश
ग्रामस्थांनी सहकार्याचे करण्याचे स्थानिक आमदारांचे आवाहन
पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील देवळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील दरडग्रस्त केवनाळे गावाच्या पुनर्वसनाचे कार्य तातडीने करण्याची गरज असून, जिऑलॉजिक सर्व्हेनुसार वर्ग 1मध्ये आल्याने पुनर्वसन कार्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महाड उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी सांगितले.
केवनाळे येथील श्रीविठ्ठलरखुमाई मंदिरामध्ये केवनाळे येथील बाधित घरांतील तसेच दरडप्रवण क्षेत्रातील अन्य घरांमधील स्थानिक तसेच मुंबईस्थित मंडळींसोबत चर्चेदरम्यान प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. भरत गोगावले यांनी शासनाने सर्वतोपरी सहकार्याची भूमिका ठेवल्याने आता ग्रामस्थांनीही त्वरित प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन केले.
याप्रसंगी पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, अनिल दळवी, तलाठी बनसोडे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे तसेच अन्य स्थानिक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी, आंबेमाची येथील ग्रामस्थ पुनर्वसनासाठी तयार नसल्याची माहिती देत आंबेमाची गावाचा जिऑलॉजिक सर्व्हे अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती दिली. आ. गोगावले यांनी पुनर्वसनमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमक्ष दरडग्रस्तांना नवीन घरे देऊन पुनर्वसन करताना पुढील ओटी, माजघर, दोन बेडरूम, किचन आणि परसावन अशा स्वरूपाचे सुमारे आठशे ते हजार स्क्वेअर फूट आकाराचे द्यावे, तसेच मंदिर, शाळा व अन्य सुविधादेखील देण्यात याव्या, अशी मागणी केल्याचे सांगितले.
यावेळी वाकण सजेचे केवनाळे गाव समाविष्ठ असलेल्या कार्यक्षेत्राचे तलाठी बनसोडे यांनी नवीन घरे देताना सध्याची घरेदेखील वापरता येतील, अशी माहिती दिल्यामुळे ग्रामस्थांना प्रशासनाची नवीन भूमिका अन्यायकारक वाटत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

पुनर्वसन आराखडा दाखवावा
पुनर्वसनासाठी नवीन घरे देताना सध्याची घरे वापरण्यास दिली तर संपूर्ण गाव पुनर्वसनास तयार होईल. जर सध्याची घरे वापरायला दिली नाही, तर पुनर्वसन आराखडा दाखवावा त्यानुसार जे ग्रामस्थ पुनर्वसनास तयार होतील, त्यांचे पुनर्वसन करावे आणि जे तयार होणार नाहीत त्यांच्यासाठी कॉमन हॉल तयार करून वापरण्यासाठी द्यावा, आपद्काळात ग्रामस्थ हा कॉमन हॉल वापरतील, अशी भूमिका मुंबई येथील केवनाळे ग्रामस्थ मंडळाच्या पदाधिकारी सदस्यांनी घेतली. यामध्ये ज्ञानेश्‍वर दाभेकर, रामजी दाभेकर, दत्ताराम पवार, गणपत दाभेकर, सीताराम पोकळे, बानोबा आगोंडे, आनंदा दाभेकर, मनोहर उफाळे, भाऊ दाभेकर, शांताराम दाभेकर, शंकर पोकळे, हरी दाभेकर, चंदर सोनावणे, आनंद सोनावणे, विठोबा दाभेकर आदींनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

Exit mobile version