भंपक आमदाराला हद्दपार कराः विनोद साबळे

। उरण । प्रतिनिधी ।

उरण विधानसभा मतदार संघातील करंजाडे शहराला वीज, पाणी, रस्ते, पुल, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडविण्याची जबाबदारी आ. बालदी यांच्याकडे आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी काहीही न करता करंजाडेमध्ये आपण हजारो कोटींची विकास कामे केल्याच्या थापा मारत आहेत. अशा विकासाच्या खोट्या वल्गना करणार्‍या भंपक आमदाराला करंजाडेकरांनी हद्दपार करून विकासाची दृष्टी असलेल्या प्रीतम म्हात्रे यांना विजयी करावे, असे आवाहन मराठा महासंघाचे समन्वयक विनोद साबळे यांनी केले.

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारानिमित्त करंजाडे येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

विनोद साबळे म्हणाले की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षात बालदी करंजाड्यात फिरकलेही नाही. येथील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत असताना येथील नागरीकांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी येथील रहिवासी त्यांना भेटले. परंतु, त्यांनी समस्या सोडवणे तर दूरच साधी दखलही घेतली नाही. येथील रस्त्यांची दूरवस्था झाली असतानाही त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, निवडणुक लागताच करंजाडेमध्ये 6 हजार कोटींचा स्काय वॉक उभारल्याचे सांगत आहेत. परंतु, करंजाडेत हा स्काय वॉक शोधूनही सापडत नाही. या भागात साधे गार्डन नाही की स्वच्छतागृह नाही. मी सरपंच असताना येथे मुबलक पाणी मिळत होते. परंतु, आज पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे, तो केवळ विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणामुळेच झाला आहे. या शहराचा विकास घडवून आणण्याची ताकद फक्त प्रीतम म्हात्रे यांच्यातच आहे. त्यामुळे या बिनकामी थापेबाज आमदारांना येथून हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी, नारायण घरत, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व्ही.बी. म्हात्रे, गोपाळ पाटील, कॉ. भुषण पाटील, काँग्रेसचे उत्तम गायकवाड, सचीन ताडफले, महेश साळुंखे, रवि घरत, मोनिका चोरघे आदी उपस्थित होते.

Exit mobile version