निधी अभावी रखडलेली रुग्णालये उभारण्याची प्रीतम म्हात्रे यांची मागणी

। उरण । वार्ताहर ।
निधी अभावी उरण तालुक्यातील रखडलेले फुंडे येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालय आणि फुंडे, म्हातवली, पिरकोन, आवरे, वशेणी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी प्रितम म्हात्रे यांनी पालकमंत्री, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यात कित्येक वर्षांपासून येथील नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. सर्पदंश आणि अपघात झाल्यास येथील नागरिकांना नवी मुंबई अथवा पनवेलला उपचारासाठी जावे लागते. हे अंतर दूर असल्याने अनेक नागरिकांचे उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण तालुक्यामधील फुंडे येथे उपजिल्हा रुग्णालयाकरीता भूखंड आरक्षित करण्यात आला आहे. त्यानुसार फुंडे, म्हातवली, पिरकोन, आवरे, वशेणी येथे उपकेंद्र मंजूर आहेत. परंतु निधीअभावी हे केंद्र अद्याप उभारण्यात आले नाहीत. त्यामुळे आपण तातडीने निधी उपलब्ध करून आरोग्य सेवेचा प्रश्‍न मार्गी लावावा असे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यानी निवेदनाद्वारे पालकमंत्री आदिती तटकरे, यांना कळविले आहे.

Exit mobile version