Samruddhi Highway Accident: भीषण अपघात! खासगी बसची ट्रकला धडक

27 प्रवासी जखमी

। बुलढाणा । प्रतिनिधी ।

समृद्धी महामार्गावरील मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ भीषण अपघात झाला. पुण्यावरून नागपूरकडे जाणारी बाबा ट्रॅव्हल्स लक्झरी बस समोरील ट्रकला पाठीमागून धडकली. हा अपघात सोमवारी (दि.8) सकाळी चार वाजताच्या दरम्यान घडला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील एकूण 27 प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी 15 जण गंभीर तर अनेकजण किरकोळ जखमी आहेत. जखमींवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘बाबा ट्रॅव्हल्स’ची ही खासगी लक्झरी बस प्रवाशांना घेऊन पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. दरम्यान, पिंपरी माळी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस समोर चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. अपघात इतका भीषण होता की, बसचा समोरील भागाचा पार चक्काचूर झाला. अपघातानंतर गेल्या एक ते दीड तासापासून काही प्रवासी बसच्या चक्काचूर झालेल्या भागामध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक पातळीवर शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि महामार्गावरील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

सर्व जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला लावून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.

Exit mobile version