Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

श्रीवर्धन शहरात खासगी सावकारीचा धंदा तेजीत
10 ते 15 टक्के व्याजाच्या कर्जाच्या विळख्यात नागरिक मेटाकुटीला

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

आर्थिक अडचणीच्या काळात तातडीने पैसा मिळतो म्हणून खासगी सावकारांकडून कर्ज घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना, 10 ते 15 टक्के व्याजाच्या ओझ्याखाली कर्जदार अक्षरशः दबून गेले आहेत. व्याज भरूनही मूळ रक्कम कायम असल्याचे सांगत कर्जदारांची पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी असून, अनेकांच्या जमिनीही सावकारीच्या विळख्यात गेल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे श्रीवर्धन शहर व परिसरात खासगी सावकारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कर्जाच्या वसुलीसाठी काही सावकारांकडून कर्जदारांवर मानसिक दबाव आणला जात असल्याचे सांगितले जाते. अनेकदा सावकार आणि कर्जदारांमध्ये वाद होऊन प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. मात्र, व्यवहाराचे कोणतेही लेखी पुरावे नसल्याने कारवाई करताना अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

काही कर्जदारांनी मूळ रकमेच्या तीन-चार पट व्याज भरूनही कर्ज बाकी असल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सावकारीच्या या विळख्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, श्रीवर्धन परिसरातील काही कर्जदार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे खासगी सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यापूर्वीही अवाजवी व्याजाच्या कर्जाच्या तणावातून परिसरातील एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे सावकारीचा हा विळखा वेळीच रोखला नाही, तर आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version