| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन नगरपरिषदेचे शिक्षण मंडळातील नियमित प्रशासन अधिकारी हे पद चक्क 2019 पासून रिक्त असून मुरुड येथील प्रशासन अधिकाऱ्यांकडे येथील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तसेच गेले काही महिने प्रशासकीय राजवट असल्याने शिक्षण मंडळाचे सभापतीही कोणी नाही.
श्रीवर्धन नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शहरांत मराठी माध्यमाच्या एकूण पाच शाळा असून सर्वांची मिळून सांप्रतची विद्यार्थी संख्या 571 इतकी आहे. तर शिक्षकांची संख्या 16 आहे. त्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या गेल्या तीन वर्षांपासून 8 इतकी आहे. मात्र हल्ली जिल्हा परिषदेच्या व अन्य खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांमधून विद्यार्थी संख्या घटत चालल्यामुळे काही वर्गांचे समायोजन करुन ते वर्ग बंद करावे लागत असल्याचे चित्र ब़ऱ्याच ठिकाणी दिसून येते. श्रीवर्धन न.प.शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील शाळांमध्ये मात्र गेल्या दोन वर्षांत कमी विद्यार्थी संख्येमुळे एखादा वर्ग कमी करावा लागला नाही ही जमेची बाजू होय.प्रशासन अधिकारी कार्यालयातील लेखनिक श्री.नलावडे हे सेवानिवृत्त झाल्यापासून लेखनिक पदही रिक्त आहे. आता नव्याने नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन शिक्षण मंडळ नव्याने स्थापन होईपर्यंत तरी प्रशासकीय कारभारांतच शिक्षण मंडळाची वाटचाल होत रहाणार ही वस्तुस्थिती आहे.