सुधागडात 83 शिक्षकांच्या जागा रिक्त ; 4 शाळांना एकही गुरुजीच नाही
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात तब्बल 83 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तर तब्बल 4 शाळांना एकही शिक्षक नाही. त्यामुळे आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय होत चालले आहे. त्यामुळे गेले मास्तर कुणीकडे अशी विचारणा आता सर्वस्तरातून होत आहे. तालुक्यात उपशिक्षकांची 61 तर पदवीधर शिक्षकांची 21 पदे रिक्त आहेत. 4 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही. तालुक्यातील नागशेत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असून त्यास तब्बल 7 वर्ग सांभाळण्याची जबाबदारी आली असून कोणतीही तक्रार न करता विद्यार्थ्यांचे हित बघून आपले काम तो शिक्षक इमानेइतबारे करीत आहे. नागशेत शाळेत 2 पदवीधर व 2 उपशिक्षक अशा शिक्षकांच्या जागा आहेत. परंतु शाळेत 1 पदवीधर शिक्षक असून 2 उपशिक्षक व 1 पदवीधर शिक्षक यांच्या जागा रिक्त आहेत. बहुतांश अशीच परिस्थिती इतर शाळांची देखील आहे.
ज्या 8 शाळांमध्ये एकही शिक्षक नव्हता त्यातील समायोजन व आंतरजिल्हा बदलीने 4 शाळा भरल्या आहेत. शिवाय ज्या शाळेत शिक्षक कमी आहेत तिथे कमी पटाच्या शाळेतील शिक्षक देऊन व्यवस्थापन केले जात आहे.
साधूराम बंगारे, गटशिक्षण अधिकारी, सुधागड तालुका
जिल्हा परिषदेच्या शाळांनी कात टाकली आहे. येथे दर्जेदार अध्यापन व भौतिक सुविधा सुद्धा मिळत आहेत. मात्र विद्यार्थी प्रमाणानुसार शिक्षक नसतील तर शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकविणार? आणि शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार किती दिवस टाकणार? हा मोठा प्रश्न असून लवकर शिक्षकांची भरती व नियुक्ती करण्यात यावी.
भावेश बेलोसे, अध्यक्ष,विद्यार्थी सेना मनसे सुधागड तालुका
एकही शिक्षक नसलेल्या शाळा व विद्यार्थी संख्या
1) खडसांबळे शाळा 12 विद्यार्थी
2) पिंपळोली शाळा 13 विद्यार्थी
3) फणसवाडी शाळा 3 विद्यार्थी (हे विद्यार्थी गोमाशी शाळेत बसवतात)
4) वैतागवाडी शाळा 5 विद्यार्थी
उपशिक्षक मंजूर पदे – 312 यातील रिक्त 61
पदवीधर शिक्षक मंजूर पदे 44 यातील रिक्त 21
पदोन्नती मुख्याध्यापक मंजूर पदे 2 यातील रिक्त 1
एकूण रिक्त पदे 83