मतदानादिवशी खासगी; सरकारी कर्मचार्‍यांना सुट्टी

। पनवेल । वार्ताहर ।

लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी होणार्‍या मतदाना दिवशी कामगारांना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे एक दिवसाची पगारी सुटी जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित आस्थापनाविरोधात निवडणूक प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक प्रशासनाने कामगार विभागाला दिल्या आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघाकरिता दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. या दिवशी प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर जनजागृती करण्यात आली. त्यातच कामगार मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यात कामगारांना मतदानासाठी दिवसभराची सुटी अथवा काही वेळ मतदानाला जाण्यासाठी दिला नाही तर याबाबत कामगारांना तक्रारसुद्धा करण्याचा अधिकार दिला आहे. निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

पूर्ण दिवस सुटी किंवा सवलत
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रात कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित महापालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक असणार आहे.
यांना द्यावी लागेल सुट्टी
मतदानादिवशी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना सुट्टीचा नियम लागू राहील. राज्य सरकार, केंद्र सरकार व खासगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी लागणार आहे.
तक्रार कोठे कराल?
मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती स्थापना करण्यात आली आहे. तसेच तक्रार निवारण करण्यासाठी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कामगारांना तक्रार नोंदविता येणार आहे.
Exit mobile version