जेएनपीटीच्या कोस्टल बर्थ जेट्टीचेही महिन्याभरात खासगीकरण

। जेएनपीटी । वार्ताहर ।
जेएनपीटीच्या कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच आता 170 कोटी खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या कोस्टल बर्थ जेट्टीचेही पीपीपी तत्वावर खासगीकरण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या महिनाभरात कोस्टल बर्थ जेट्टी पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली आहे.

जेएनपीटी बंदरातून देशातील एकूण सरकारी 11 बंदरांपैकी 53 टक्के मालाची वाहतूक केली जाते. जेएनपीटी बंदरातून दररोज 40टक्के कंटेनर मालाची वाहतूक केली जाते.याच बंदरातून कंटेनर ट्रेलर मुंबई भिवंडी, नवी मुंबई, पनवेल येथील मोठ मोठ्या गोदामात ने-आण केली जाते.या गोदामातून कंटेनर मालाचे देशभरात वितरण केले जाते. बंदरातुन दररोज आयात-निर्यात होणार्‍या रोडच्या माध्यमातून मालाची वाहतूक केली जाते.दररोज सुमारे वीस हजार कंटेनर मालाच्या वाहतुकीमुळे जेएनपीटी पासुन ठाणे, मुंबई पर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.

170.20 कोटी खर्चाच्या या कोस्टल बर्थवरुन 2.5 दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्याची योजना आहे.यामध्ये ब्रेक बल्क, ड्राय बल्क, सिमेंट,ईडिबल ऑईल आदी मालाची रोड ऐवजी थेट समुद्रमार्गे देशभरात वितरण करण्यात येणार आहे.सिमेंट स्टोरेजसाठी जेएनपीटी 11 हेक्टर बँकअप क्षेत्रासह कार्गो स्टोरेज यार्ड,गोदामे उभारणार आहे.तसेच किनारपट्टीवरील मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्याप्रकारे पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

कोस्टल बर्थमुळे रस्ते आणि रेल्वेवरील माल वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. जहाजाच्या फेर्‍या जलदगतीने होण्यासाठीही मोठी मदत होणार आहे.तसेच वाहतूकीसाठी कमी होणार्‍या स्पर्धात्मक दराचा फायदाही व्यापार्‍यांना होणार असल्याची माहिती जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली आहे.

Exit mobile version