| रसायनी | प्रतिनिधी |
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रिआ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत शाळेच्या एकूण 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर 6 सुवर्णपदके, 3 रौप्यपदके आणि 4 कांस्यपदके, अशी एकूण 13 पदके पटकावून शाळेचा नावलौकिक उंचावला.
या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर दिली. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी मिळवलेले हे यश शाळेसाठी अभिमानास्पद ठरले आहे. या यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक व्यंकटेश थेवर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडाकौशल्याला योग्य दिशा देण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, प्रिआ कमिटीचे सर्व सदस्य, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक शिक्षक व्यंकटेश थेवर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भविष्यातही विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अशीच यशस्वी कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
प्रिआ स्कूलची दमदार कामगिरी
