पुरुष-महिला गोविंदा पथकांसह रिल्स स्पर्धेचे आकर्षण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचा जल्लोष शेतकरी भवनसमोर रंगणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, मान्यवरांच्या उपस्थितीत 24 वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा हा उत्सव शनिवार, दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने हा सोहळा रंगणार असून, सलामी देणाऱ्या तसेच दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना लाखोंची बक्षिसे आणि रिल्स स्पर्धेचे वेगळे आकर्षण या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने सर्व घटकांतील मंडळी एकत्र यावीत, नागरिकांना सांस्कृतिक जल्लोषाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. आज या उत्सवाने 24 वर्षांची गौरवशाली परंपरा जपली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख तथा उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह ज्येष्ठ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींच्या उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ पारंपरिक पद्धतीने केला जाणार आहे.
फुलांनी सजवलेली दहीहंडी उभारली जाणार आहे. गोविंदा पथकांसह नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोजकांनी वेगवेगळ्या समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमार्फत संपूर्ण उत्सवावर देखरेख ठेवण्याचे काम केले जाणार आहे. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांसह रुग्णवाहिका आदी वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांना उत्सवाचा आनंदमय व शांततामय वातावरणात आनंद घेता यावा, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घरबसल्यादेखील या उत्सवाचा आनंद घेण्याची सोय करण्यात आली आहे.
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मानाच्या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या पुरुषांच्या अंतिम विजेत्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख दोन लाख 51 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, तर सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देऊन सन्मान केला जाणार आहे. अंतिम विजेत्या महिला गोविंदा पथकाला प्रथम क्रमांकाचे एक लाख एक हजार रुपये व चषक असे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त अलिबाग तालुका मर्यादित रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मानवी मनोऱ्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या दहीहंडी उत्सवाच्या रिल्स काढणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. रिल्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यांना अकरा हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला रोख सात हजार रुपये व सन्मानचिन्ह, तसेच तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये व सन्मानचिन्ह असे बक्षीस दिले जाणार आहे.
