प्रो-कबड्डीचा अंतिम सामना पुण्यात

। पुणे । प्रतिनिधी ।

यंदाच्या प्रो-कबड्डी लीगच्या बाद फेरीच्या लढती आणि अंतिम सामना पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे 26 ते 29 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. प्रो कबड्डी लीग टप्प्यातील अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघ 26 डिसेंबर रोजी एलिमिनेटर टप्प्यात आमनेसामने येतील. यावेळी तिसर्‍या क्रमांकावर येणारा संघ एलिमिनेटर 1 मध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल. तर, चौथ्या स्थानावरील संघ पाचव्या स्थानावरील संघाशी एलिमिनेटर 2 मध्ये खेळणार आहे.

एलिमिनेटर 1चा विजेता उपांत्य फेरीत गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणार्‍या संघाशी खेळेल. तर, एलिमिनेटर 2चा विजेता दुसर्‍या उपांत्य फेरीत गुणतालिकेतील दुसर्‍या स्थानावरील संघाशी खेळणार आहे. या दोन्ही उपांत्य लढती 27 डिसेंबर रोजी खेळवल्या जाणार आहेत. त्यानंतर अंतिम लढत 29 डिसेंबर रोजी होणार आहे. लीगचा दुसरा टप्पा सध्या नोएडा येथे सुरु असून हा टप्पा 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 3 ते 24 डिसेंबर दरम्यान अखेरचा टप्पा पुण्यातच खेळविला जाणार आहे. त्यानंतर बाद फेरीच्या लढती होणार आहेत.

Exit mobile version