विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीत विघ्न

 पाले बुद्रुक येथील घटना
 रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील दिड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन शांततेत पार पडत असताना पाले बुद्रुक येथील विसर्जन मिरवणुकीत मात्र जागा मालकाने विघ्न आणल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत विसर्जनासाठी आणलेले गणपती विसर्जन न करता जागेवरच ठेवून आपला निषेध व्यक्त केला आहे.
पाले बुद्रुक येथील गट क्रमांक 151 व 170 या मिळकती एका व्यक्तीने खरेदी केल्या आहेत. या जागेतून पाले बुद्रुक येथील ग्रामस्थांचा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता संबंधितांनी बंद केल्याने 2009 पासून ग्रामस्थ व संबंधित जागा मालक यांच्यात विवाद सुरू आहे. तहसीलदार व प्रांताधिकारी रोहा यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये ग्रामस्थांच्या बाजूने निकाल लागला असून ग्रामस्थांच्या वहिवाटीचा हक्क मान्य करण्यात आला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देत संबंधित जागा मालकाने ग्रामस्थांच्या वहिवाटीला तात्पुरता स्थगिती आदेश मिळवून या रस्त्यावर गेट टाकल्याने पाले बुद्रुक ग्रामस्थांना त्यांच्या पारंपरिक गणेश विसर्जन करण्याच्या जागेवर अटकाव करण्यात आला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आपल्या गणेश मूर्ती विसर्जन न करता रस्त्यावरच ठेवून निषेध केला असल्याची माहिती तंटामुक्त अध्यक्ष शिवराम महाबळे यांनी दिली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोलाड सपोनि जाधव आणि रोहा तहसीलदार कविता जाधव- माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांची समजूत काढून अन्य घाटावर नेऊन गणेश विसर्जन करण्याचा पर्याय दिला. परंतु ग्रामस्थ आपल्या परंपरागत जागेवरच गणपती विसर्जन करण्याच्या भूमिकेवर ठाम होते.अखेर ग्रामस्थ रस्त्यातच गणपती ठेवून गेल्याने प्रशासनाने गाडीची व्यवस्था करत विधिपूर्वक गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
उच्च न्यायालयाने निकालाला स्थगिती आदेश दिल्याने स्थानिक प्रशासनाचे हात बांधलेले असून न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार रोहा यांनी व्यक्त केले आहे.प्रशासनाने सदर वाद सामोपचाराने सोडवून गणेश विसर्जन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. पण प्रशासनाने याबाबत तोडगा न काढल्याने पाले बुद्रुक गाव अध्यक्ष व आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे तसेच संभे सरपंच समीर महाबळे यांनी नाराजी व्यक्त केली असून उच्च न्यायालयात या स्थगिती आदेशाच्या विरोधात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version