। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहरातील जसपाल सहानी यांच्या डिवाईन होम स्टेवर मुरुड नगरपरिषदेकडून कार्यवाही करण्यात आली आहे. रस्त्यानजीक असणारी संरक्षक भिंत व पर्यटकांना बसण्यासाठी षट्कोनी आकारचे तयार करण्यात आलेले गजेबो जेसीबीच्या साह्याने तोडून टाकण्यात आले आहेत. ही कारवाई मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनखाली कार्यालयीन अधीक्षक नंदकुमार आंबेतकर, कर निरीक्षक अनिकेत जगदाळे, मुरुड शहर अभियंता अनिकेत वाजे, शहर रचना सहाय्य्क अनिकेत भोसले व सर्व नगरपरिषद कर्मचारी वृंदांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
याबाबत मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी कृषीवल प्रतिनिधीला सांगितले की, हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी डिवाईन होम स्टेच्या मालकाला 7 दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती.तरी सुद्धा बांधकाम न हटवल्याने मुरुड नगरपरिषदेला ही कार्यवाही करावी लागली. तसेच, संबंधित मालक पर्यटकांना महागड्या दराने रूम देऊन सुद्धा नगरपरिषदेला रेसिडेन्शियल टॅक्स भरीत होता. यामधील काही जास्तीचे बांधकाम बांधून सुद्धा कर्मशियल टॅक्स भरत नव्हता. त्यामुळे ही कार्यवाही केली असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.