उत्तीर्ण झाल्याने जेसीबीवरुन मिरवणूक

| उरण | वार्ताहर |

चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोटारसायकल व जेसीबीवरुन मिरवणूक काढली आहे.

सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईलमध्ये आपले लक्ष केंद्रित करून आपला वेळ, आयुष्य वाया घालवीत आहे. त्यात चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात लक्ष न देता मोबाईल व इतर बाबींकडे लक्ष केंद्रित करत होता. त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार असे त्यांच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु, सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन दिले की मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्यांला दहावीच्या परीक्षेत 50 टक्के गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सार्थक नारंगीकरची मोटारसायकल व जेसीबीवरुन मिरवणूक काढली. यावेळी गावातील अनेक नागरीकांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version