मुंबई | प्रतिनिधी |
येत्या सप्टेंबर महिन्यापासून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डसोबतच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचेदेखील उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांनादेखील लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. मात्र, त्यामुळे लसींचा पुरवठा अपुरा पडू लागला. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींनादेखील मंजुरी देण्यात आली असून, लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे करोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.