महावितरणच्या मालमत्तेवर ग्रामपंचायत कर आकारण्याचा इशारा
सौरऊर्जा पॅनल बसविण्याचा पर्याय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मागील थकीत बिल ग्रामपंचायत कशी भरणार असा सवाल उपस्थित करत मागील थकीत बिलाचा भार ग्रामपंचायतीला न परवडण्यासारखा आहे. महावितरणने याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा महावितरण कंपनीच्या मालमत्तेवर ग्रामपंचायत कर आकारला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा आघाडीचे गटनेते अॅड. आस्वाद पाटील दिला आहे. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेचे पॅनल बसवून मार्ग काढण्याचा पर्यायही यावेळी व्यक्त करण्यात आला.
थकीत वीज बिलामुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात पथदिव्यांचे कनेक्शन तोडले आहे. महावितरण कंपनीच्या या कारभाराबाबत अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेचे शिवसेना, शेकाप व अन्य पक्षातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी सर्वपक्षीय सदस्यांसह महावितरणचे अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद शिवसेना विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, सरपंच सुधीर थळे आदी शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना व अन्य पक्षातील पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व महावितरण कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.
2018 नंतर नवीन कनेक्शन घेतलेल्या ग्रामपंचायतीने पथदिव्यांचे वीज बिल भरावे, असे राज्य सरकारचे पत्रक असतानाही महावितरण कंपनीने या पत्राकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर थकीत वीज बिलाचा भार टाकला. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या लॉकडाऊनमुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील पथदिव्यांचे वीज कनेक्शन पुन्हा सुरु करून नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, थकीत वीज बिलाबाबत ग्रामपंचायतींनी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा महावितरण कंपनीने पथ दिव्यांचे कनेक्शन तोडून टाकले. त्यामुळे हजारो गावे अंधारात राहिली आहेत.
महावितरण कंपनीच्या या कारभाराबाबत अलिबाग तालुक्यातील सर्वपक्षीय रायगड जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच यांनी आक्रमक भूमिका घेऊन जिल्हा परिषद सदस्य अॅड. आस्वाद पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. शासनाच्या परिपत्रकानुसार, 2018 नंतर नवीन वीज कनेक्शन घेतल्यास ग्रामपंचायतींनी वीज बिल भरणे आवश्यक आहे. मात्र, आपल्या सोयीनुसार नियम लावून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वेठीस धरून गावांतील पथदिव्यांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. हे महावितरण कंपनीने थांबविणे गरजेचे आहे, अन्यथा महावितरण कंपनीवर मालमत्ता कर आकारला जाईल, असा इशारा अॅड. आस्वाद पाटील यांनी दिला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य चित्रा पाटील, प्रियदर्शनी पाटील, गटविकास अधिकारी डॉ. दीप्ती देशमुख, उपसभापती मीनल माळी, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच यतीन घरत आदी उपस्थित होते.
पथदिव्यांच्या वीज बिलालाबाबत ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले, वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडू नये. दोन दिवसांत यावर चर्चा करून वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.
अॅड. आस्वाद पाटील