प्रा. आ. केंद्रासमोरील त्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्याच्या अधिका-यांचे दुर्लक्ष
| नागोठणे । वार्ताहर ।
राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघाल्याने एक भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिका-यांनी याकडे डोळेझाक केली आहे. आता त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघून या खड्ड्यासह व येथील दुस-या खड्ड्यांची तसेच उखडलेल्या साईड पट्टीची तातडीने डागडुजी करावी अशी अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे.

महामार्गातील पहिल्या व महत्वाच्या अशा पळस्पे ते इंदापूर या सुमारे 84 किलोमीटरच्या अंतरातील रस्ताचे चौपदरीकरण 13 वर्षांपूर्वीच सुरु करण्यात आले होते. मात्र अद्यापही महामर्गाचा हा पहिला टप्पा अपूर्णच आहे. यातील वडखळ, नागोठणे, सुकेळी खिंड ते कोलाड या अंतरातील रस्त्याची अवस्था तर आजही भयानक आहे. आलटून पालटून सत्तेवर येणार्‍या कोणत्याही राजकीय पक्षाने या रस्त्याच्या पूर्णत्वाच्या बाबतीत केलेली सर्व आश्‍वासने आजपर्यंत हवेतच विरून गेली आहेत. या राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना याबाबतीत कोणतेही सोयरसुतक राहिलेले नाही. त्यामुळेच रस्त्याचे काम अपूर्ण असतांनाच अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

असाच काहिसा प्रकार मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच असलेल्या नागोठण्यातील प्रा.आ.केंद्राच्या समोरील रस्त्याच्या बाबतीत दिसून येत आहे. येथील पेव्हर ब्लॉक निघाल्याने एक जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. तसेच याच ठिकाणी इतर अनेक छोटे खड्डे तयार झाले असून नागोठण्यात येण्यासाठी असलेल्या रस्त्याची साईड पट्टी पूर्णतः निघाली आहे. यामुळे या ठिकाणी शंभर मिटरच्या अंतरातील रस्ता अंत्यंत धोकादायक बनला आहे. या ठिकाणी असलेला हा खड्डा चुकवायला गेल्यास एकतर रस्त्याखाली जायची भिती अथवा मागून येणार्‍या वाहनाने धडक देण्याची भिती निर्माण झाल्याने येथे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागोठणे प्रा.आ. केंद्रासमोरील हे खड्डे व साईड पट्टी तातडीने बुजविण्याची गरज निर्माण झाली आहे.

Exit mobile version