। मुंबई। प्रतिनिधी।
क्षुल्लक वादातून आलोककुमार सिंग (30) या कॉलेज प्राध्यापकाची अज्ञात व्यक्तीने हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी (दि.24) सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकात घडली. आज सकाळी ओमकार एकनाथ शिंदे (27) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत रेल्वे पोलिसांनी माहिती दिली. या हल्ल्यातील मृत आलोक कुमार सिंग हे कांदिवली येथे राहणारे असून विलेपार्ल्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते.
मालाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1-2 वर चर्चगेट बोरिवली लोकलच्या जनरल डब्यात सायंकाळी सहाच्या सुमारास एक मारामारीची घटना घडली. या घटनेत अलोक कुमार सिंग यांचे संशयित आरोपीसोबत भांडण झालं होतं. गाडीतून उतरताना दोघांमध्ये वाद झाला. यातील संशयित आरोपीने अलोक कुमार सिंग याच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्याला जीआरपीएफ पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात नेलं असता मृत घोषित करण्यात आले. त्या अनुषंगाने बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात हत्येसारखा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास बोरीवली रेल्वे पोलीस आणि झोनमधील सर्व पोलीस ठाण्यामार्फत चालू केला. संशयिताचे एफआरएसमध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो साधारण मालाड येथून चर्नीरोडला रोज जाताना आणि नियमित गाडीने परत येताना दिसला. त्यामुळे त्याला आज पकडण्यासाठी मालाड येथे ट्रॅप लावला होता. त्या ट्रॅपमध्ये तो सापडला. त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली आहे. हत्येसाठी जे धारदार शस्त्र वापरण्यात आलं होतं, ते शस्त्र आरोपीने फेकून दिलं आहे. त्यामुळे त्याअनुषंगानेही चौकशी होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला 30 जानेवारीपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या; आरोपीला अटक
