। कल्याण । प्रतिनिधी ।
समर्पित भावनेतून काम करणार्या कर्मचार्यांमुळे आज महावितरण ही देशात वीज वितरण क्षेत्रात अव्वल स्थानावर आहे. ऊन, वारा, पाऊस, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा सामना करत अविरत व अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रकाशदूत कायम कटीबद्ध आहेत. नाविन्यपूर्वक सेवेसाठी महावितरणला मिळत असलेले पुरस्कार आणि कोट्यवधी ग्राहकांच्या सेवेतील समाधानामागे कर्मचार्यांची समर्पित भावना व त्यांच्या कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले.
महावितरणच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (06 जून) कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण परिमंडल, कल्याण एक आणि दोन तसेच कल्याण स्थापत्य मंडलांतर्गत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात फुगे सोडून तसेच कर्मचार्यांच्या पाल्यांकडून केक कापून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वेदांत नाईटस्च्या संगीत संध्येत सादर करण्यात आलेल्या मराठी-हिंदी गितांनी उपस्थित कर्मचारी व कुटुंबीयांना खिळवून ठेवले. तर नकलाकार राहुल इंगळे यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला अधिकारी, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंते, कर्मचारी, कंत्राटी कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, वर्धापन दिन कार्यक्रम संयोजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता अनिता चौधरी व समीर दळवी यांनी केले.