निवडणूक आयोगाचे आदेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
लोकसभा निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. निवडणूक प्रचारात लहान मुलांना आणि अल्पवयीनांना सहभागी करु नका, असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत लहान मुलं पत्रकं वाटताना, पोस्टर चिकटवताना, घोषणा देताना, पक्षाचे झेंडे-बॅनर घेऊन मुलांना घोषणा द्यायला लावू नका, नाहीतर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीदच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करणं निवडणूक नियमांचा भंग ठरणार आहे.
निवडणुकीशी संबंधित कामं, निवडणूक प्रचारातील मुलांचा सहभाग सहन केला जाणार नाही. त्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी करणं, त्यांना कविता, गाणी म्हणायला लावणं, घोषणा देण्यास सांगणं, त्यांच्याकडून एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार करुन घेणं या सगळ्यांवर बंदी असेल. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित कोणत्याही गोष्टींमध्ये मुलांना सहभागी करता येणार नाही. आयोगानं नियमावली जारी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ दिला. सर्व राजकीय पक्षांनी सुधारित अधिनियम 2016 चं पालन करावं. आपल्या प्रचारात लहान मुलांना सहभागी करुन घेऊ नये. पक्षाच्या उमेदवारांना यासाठी परवानगी देऊ नये, अशा सूचना निवडणूक आयोगानं केल्या आहेत.
नियमावलीचं उल्लंघन झाल्यास कारवाई एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने निवडणुकीत लहान मुलांचा वापर केल्यास त्यांच्यावर बालकामगार कायद्यांसह इतर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, उमेदवाराच्या आईवडिलांसोबत त्यांचा मुलगा असेल तर हा निवडणुकीचा भंग मानलेला नाही. तसेच निवडणूक प्रचाराच्या गाईडलाईनचं उल्लंघनही मानलं जाणार नाही.
राजकीय पक्षांनी परवानगी देऊ नये आयोगाने आपल्या गाईडलाईनमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला आहे. सुधारीत अधिनियम, 2016नुसार सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर होणार नाही हे निश्चित करावं आणि राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना त्याची परवागनी देऊ नये.