औद्योगिक क्षेत्रात प्रतिबंधात्मक मनाई

| रायगड | प्रतिनिधी |

खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या आहेत. कामगार संघटनांकडून विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन जातीय तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेने औद्योगिक क्षेत्राकरिता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.

रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावामध्ये हिंदू-मुस्लिम-बौद्ध तसेच इतर धर्मियांची मिश्रवस्ती आहे. अधून-मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिंदू-मुस्लिम व्यक्तींमध्ये दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडत असतात. त्यामुळेदेखील हिंदू-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होतेे. औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी, तसेच राजकीय परिस्थिती आंदोलन/उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत 2 ते 16 जानेवारी रोजी या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ही अधिसूचना प्रेतयात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही. तथापि, या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका आदी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात येत आहेत. तहसीलदारांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर राहील, या अटीवर परवानगी द्यावी, असे शिर्के यांनी म्हटले आहे.

Exit mobile version