प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे न्यायासाठी उपोषण

अलिबाग | प्रतिनिधी |

पळस्पे ते इंदापूर या चारपदरी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत जमिनीला वाढीव भाव द्या, नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकरी जनार्दन नाईक यांनी अलिबाग येथील जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर उपोषण सुरु केले  आहे. या उपोषणाला अन्यायग्रस्त शेतकरी समीर नागोठणेकर, काशीनाथ नाईख, जितेंद्र जोशी, गणेश भोपी, खंडू भोईर, दिलीप भोय, विठ्ठल कदम यांनी पाठींबा दर्शविला आहे.
पनवेल ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने होत असल्याच्या तक्रारी होत असताना, ज्या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत 20 एप्रिल रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे  घेण्यात आले. आठ दिवसांत घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. याबाबत लागणारे पुरावे नाईक यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. परंतु, पेण प्रांताकडून पुरावे सादर करण्यास दिरंगाई झाली. 25 दिवसात न्याय मिळावा असा अल्टीमेटम नाईक यांनी दिला होता. तरीही वाढीव मोबदला देण्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकरी जनार्दन नाईक यांनी पुन्हा 16 मेपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणामध्ये अनेक शेतकरी पाठिंबा दर्शविण्यासाठी सहभागी झाले आहेत. न्याय मिळेपर्यंत हा लढा असणार आहे, असे जनार्दन नाईक यांनी सांगितले.
2011 मध्ये पळस्पे ते इंदापूरच्या चारपदरी महामार्गासाठी गेलेल्या जमिनीत शेतकऱ्यांना अत्यंत्य कमी भाव दिला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना चौपट रक्कम मिळावी. अतिरिक्त भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा व भूसंपादन केलेल्या जागेची हद्द कायम करावी, अशा प्रकारची मागणी या उपोषणद्वारे त्यांनी केली आहे.

Exit mobile version