रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; आझाद मैदानावर 80 व्या दिवशी आंदोलन सुरूच
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमीपुत्रांनी कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू केलेले बेमुदत उपोषण 80 व्या दिवशीही सुरूच असून, न्याय मिळेपर्यंत माघार नाही अशी, ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. कंपनी व्यवस्थापन, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी तीव्र संताप व्यक्त केला.
भूमीपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था-नागोठणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन 7 ऑक्टोबर 2025 पासून सुरू आहे. पूर्वीच्या आयपीसीएल आणि सध्याच्या रिलायन्स नागोठणे प्रकल्पातील प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. “कॉल लेटर मिळेपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, जीव गेला तरी मागे हटणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
24 जून 2025 रोजी मंत्रालयात मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 324 प्राधान्य प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांना दोन महिन्यांत नोकरीत सामावून घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी निर्देश जिल्हाधिकारी रायगड व रिलायन्स कंपनी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र, कंपनी आडमुठी भूमिका घेत असून, मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आंदोलन चिरडण्याचे विविध स्तरांवर प्रयत्न होत असल्याचाही आरोप आंदोलकांनी केला. “आम्ही माणसं आहोत की जनावरे?” असा संतप्त सवाल करत, तीन पिढ्या न्यायासाठी झगडत असल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली. यापूर्वीही मोर्चे, उपोषणे, जेलभरो अशा आंदोलनांत सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा प्रकल्पग्रस्तांच्या जीवितास काही बरे-वाईट झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व रिलायन्स व्यवस्थापनावर राहील, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनीमे, उपाध्यक्ष रोशन जांभेकर, सचिव राकेश जवके व इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.






