। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरामध्ये दोन दिवस पाणी पुरवठा झाला नाही तर सगळीकडे बोंबाबोंब होते, मात्र प्रकल्पग्रस्त गावांना गेले 34 दिवस पाणीपुरवठा होत नाही. याकडे सिडको गांभीर्याने पाहत नसल्याने पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली 18 गाव सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ तसेच एमजेपीएलचे पाटील, सिडकोचे चौटाला, गायकवाड, जगदाळे, पनवेल सिडको 1 चे रामवड, शिरशिकर अशा सर्वांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश दिसून आला.
प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत, परंतु पाणी ही ज्वलंत समस्या असल्यामुळे ती त्वरीत सोडविणे गरजेचे आहे. पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. असे असले तरी या गंभीर प्रश्नाकडेही सिडको गांभिर्याने पहात नसेल तर मग आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. तसेच आंदोलनही आक्रमकपणे केले जाईल अशी भूमिका यावेळी प्रकल्पग्रस्तांनी घेतली. अखेर प्रकल्पग्रस्तांचे रौद्र रुप पाहून सोमवार 20 जून रोजी सकाळी 11 गावांना पाणी न मिळाल्याने रात्री 10 ते सकाळी 10 पर्यंत पाणी सोडू असे सांगण्यात आले. तसेच मंगळवारी वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने बुधवारी सकाळी 4 ते दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे 11 तास पाणी 11 गावांना देण्यात येईल. हा नित्यक्रम प्रतिदिन सुरु राहील. तर गाढेश्वर धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यावर एमजेपीचे पूर्ण पाणी गावांना मिळू शकणार असल्याचे सिडको व एमजपीचे अधिकार्यांनी सांगितले.