वांद्रे धरणाला प्रकल्पग्रस्तांचा विरोध: खोकरी धरणाची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित वांद्रे धरणाला तीव्र विरोध असून, वांद्रेऐवजी खोकरी धरण बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने दत्ताराम धनावडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मुरुड तालुक्यातील नांदगाव, उसरोली व मजगांव ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावांची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वांद्रे धरण स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसन समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या एक तपाहून अधिक काळ या प्रस्तावित धरणाला स्थानिक लोक सनदशीर मार्गाने विरोध करीत आहेत.

यामुळे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, भरपाई, मोबदला, वन विभाग, गुरचरण जमीन, अभयारण्य पर्यावरणविषयक परवानग्या असे कोणतेही सोपस्कार पार न पाडता थेट केवळ राजकीय हेतू साधण्यासाठी काही स्थानिक लोकप्रतिनिधी लोकांची दिशाभूल करत आहेत. सर्व परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे, शेतीविषयक समस्येचे निवारण अथवा स्थानिकांची संमती घेतल्यानंतरच वांद्रे धरण प्रकल्प जाहीर करण्याबत विचार व्हावा, अशी आमची मागणी आहे.

या प्रकल्प क्षेत्रातील एकूण 70.42.6 हेक्टर जमिनीपैकी 54.22.00 हेक्टर जमीन ही शेतजमीन आहे व सध्या लोकांचा उदरनिर्वाह याच शेती व्यवसायावर अवलंबून आहे. सध्याची फोपली गावातील 300 लोकवस्ती व शेतजमीन, वांद्रे 600 लोकवस्ती व त्यांची शेतजमीन, खापरी गावातील 300 लोकवस्ती,शेतजमीन व करनी गावातील 200 लोकवस्ती व त्यांची शेतजमीन प्रभावित होणार आहे.

वांद्रे, फोपली, खापरी व करजी गावाच्या लोकवस्ती व शेत जमीन तसेच फणसाड अभयारण्य कायद्याच्या तरतुदींचा गांभीर्याने विचार होऊन वांद्रे प्रकल्प पूर्णतः रद्द करावे व पर्यायी व्यवस्था म्हणून मजगाव खोकरी धरण प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी दत्ताराम धनावडे यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

Exit mobile version