| अलिबाग | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील करंजा गावातून करंजा-रेवस पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पुलासाठी अडीच हजार ते सात हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. या पुलाचे बांधकाम ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, रोजगार मिळावा, पुलासाठी लागणारे सर्व कॉन्ट्रॅक्ट करंजा येथील आगरी प्रकल्पग्रस्तांना द्यावे. करंजा-रेवस पूल बाधित प्रकल्पग्रस्त 60 टक्के मच्छिमार आगरी आहेत. या पुलामुळे आगरी मच्छिमारांचा कायमचा रोजगार बुडणार आहे. त्यामुळे आगरी मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, ठेका देण्यापासून रोजगार, नोकऱ्या देणार नसल्याची भूमिका ॲफकॉन कंपनीने घेतली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आहेत.
महाराष्ट्र रस्ते, विकास महामंडळाच्या देखरेखेखाली पुलाचे काम चालू आहे. प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा पुकारण्यात आला आहे. त्यामुळे येत्या स्वातंत्र्यदिनी 15ऑगस्टला प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.