पावती फाडा अन् हातगाडी लावा!
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद हद्दीत पावती फाडा आणि शहरात कुठेही गाडी लावून व्यवसाय करा, अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील रस्ते, चौक, फुटपाथ आणि सार्वजनिक जागांवर छोट्या-मोठ्या टपऱ्या व हातगाड्यांचे जाळे वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासनाच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उरण नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारापासूनच टपरीराज सुरु होत आहे. आजच्या घडीला उरण शहरात तब्बल दोन ते अडीच हजारांच्या आसपास टपऱ्या व हातगाड्या कार्यरत असल्याची चर्चा आहे. यातील काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील जागेत टपऱ्या उभारून त्या तब्बल 7 ते 10 हजार रुपये महिन्याला भाड्याने दिल्याचे बोलले जाते. पालिकेच्या जागेचा वापर करून खासगी व्यक्तीने भाडे वसूल करायचे आणि पालिकेच्या तिजोरीत मात्र नाममात्र महसूल जमा व्हायचा, असे असेल तर हा प्रकार म्हणजे कुंपणच शेत खात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पालिकेच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून माल विक्रीसाठी ठेवला जात असल्याच्या तक्रारी आहेत. एवढेच नव्हे तर पालिकेच्या जागेवरच बेकायदेशीर दुकान उभारून व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. मग अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा हात का उठत नाही? प्रशासनाला हे अतिक्रमण दिसत नाही की दिसूनही डोळेझाक केली जाते, असा सवाल उरणकर विचारत आहेत.
दुसरीकडे नगरपरिषदेकडून दररोज फेरीवाल्यांकडून पावत्या फाडल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या पावत्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत किती महसूल जमा होतो, किती पावत्या फाडल्या जातात, किती रक्कम वसूल होते आणि त्याचा अधिकृत हिशोब काय, याची माहिती जनतेसमोर येणे गरजेचे आहे. पावती फाडणारा कर्मचारी वर्षानुवर्षे त्याच ठिकाणी का? महसूल वसुलीची जबाबदारी असलेली व्यक्ती दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असेल तर त्या वसुलीची स्वतंत्र तपासणी, पावती पुस्तकांचा ताळमेळ आणि बँक जमा रकमेची पडताळणी करण्याची वेळ आली आहे. पावती पुस्तकापासून पालिकेच्या तिजोरीपर्यंत पैशाचा प्रवास पारदर्शक आहे का? याचे उत्तर पालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्यांवर हातगाड्या उभ्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद यांच्या बैठका होतात, कारवाईची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात हातगाड्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. उरण शहराचा विकास झपाट्याने होत असताना नियोजनाशिवाय वाढणाऱ्या फेरीवाला व्यवसायामुळे शहराच्या वाहतुकीवर आणि सार्वजनिक जागांवर मोठा ताण येत आहे. स्थानिक असो वा बाहेरून आलेला कायद्याचे नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. परवाना, नोंदणी, जागेची परवानगी, अतिक्रमण आणि कर वसुली यांची एकत्रित तपासणी झाली तर शहरातील नेमके चित्र समोर येऊ शकते. आठवडा बाजारामुळेही वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे बाजाराचे नियोजन, विक्रेत्यांची नोंदणी, जागेचे नियमन आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबत प्रशासनाने ठोस धोरण राबविणे आवश्यक आहे.
