पेण शहरात कार्यकर्त्यांची वानवा
| पेण | प्रतिनिधी |
पेण शहरात शुक्रवारी (दि. 19) महायुतीच्या प्रचाराचा नारळ पेण येथील कोल्हेटकर मंदिरात फोडण्यात आला. कार्यक्रमाची वेळ चारची ठरली होती. भाजप कार्यकर्ते चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने हजर होते. परंतु, ज्या पक्षाचा उमेदवार आहे, त्या पक्षाचे कार्यकर्ते पाच वाजले तरी हजरच नव्हते. अखेर 5.10 च्या सुमारास प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकर्ते हजर नव्हते.
पेण शहरात सध्याच्या स्थितीला राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) 6 नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष अशी कार्यकर्त्यांची फळी आहे. प्रत्येक नगरसेवकांनी व आजी-माजी नगरसेवकांनी दहा कार्यकर्ते आणले असते तरी 100 ते 150 कार्यकर्ते सहज हजर झाले असते. परंतु, तसे झाले नाही. बोटावर मोजण्याएवढेच राष्ट्र वादीचे कार्यकर्ते हजर होते. त्यातच मा. नगराध्यक्ष संतोष श्रृगांरपुरे व मा. उपनगराध्यक्षा वसुधा पाटील यांची गैरहजेरी प्रकर्षाने जाणवत होतीच. त्यातच चर्चेचा विषयही होता. प्रचार रॅलीमध्ये पाच नगरसेवक, तीन मा. उपनगराध्यक्ष, अशी राष्ट्र वादीचे नेतेगण उपस्थित असूनही त्यांना कार्यकर्ते जमवता आले नाहीत. तर, शिंदे गटानेसुद्धा या प्रचाराकडे पाठ फिरवली होत.