। पनेवल । प्रतिनिधी ।
पनेवल महानगरपालिकेने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्यास उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता आज दिनांक 30 सप्टेंबर पर्यंत मालमत्ता करांवरती 10 टक्के सवलत तसेच ऑनलाईन कर भरल्यास वाढीव 2 टक्के सूट देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले होते. या सवलतीचा आजचा(30 सप्टेंबर) अखेरचा दिवस असल्याने या सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. दिवसा अखेर जवळपास 2 कोटी रूपयांचे कर संकलन झाले.
पनवेल महानगरपालिकेने सुधारित मालमता कर आकारणीवरती 31 जुलै पर्यंत 17 टक्के कर सवलत दिली होती. या सवलतीचा पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणत लाभ घेतला होता. आता पुन्हा एकदा महापालिकेने मालमत्ता करांवर 10 टक्के सूट तसेच ऑनलाईन कर भरल्यास वाढीव 2 टक्के सूट अशी एकुण 12 टक्के सवलत दिली होती. यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसाअखेर दिनांक 30 सप्टेंबरचे एकुण 59 कोटी कर संकलन झाले आहे.