| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील शहाबाज व नवखार येथे चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही घटना 17 ते 24 जूनच्या दरम्यान झाल्या असून, पोयनाड व मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोयनाड परिसरातील शहाबाज येथील तक्रारदाराने 19 जून रोजी रात्री नऊ वाजता त्यांच्या घरासमोरील अंगणात दुचाकी पार्कींग करून ठेवली होती. चोरट्यांनी 19 ते 23 जूनच्या दरम्यान ही दुचाकी लंपास केली. एकूण 10 हजार रुपये किंमतीची चोरी झाल्याचे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहे. मांडवा परिसरातील नवखार येथील तक्रारदाराच्या घरात घुसून चोरट्यांनी 17 ते 24 जूनच्या दरम्यान घरफोडी केली. घरातील लोखंडी कपाटामधून एक लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केला. मांडवा सागरी व पोयनाड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या चोरी व घरफोडीच्या घटनेमध्ये दीड लाख रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. त्यामुळे मालमत्ता सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.







