। पनवेल । प्रतिनिधी ।
रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने प्रवासात असलेल्या एका कुटुंबाची कार हॉटेलबाहेर पार्क केलेली असताना, चोरट्यांनी वाहनाची काच फोडून त्यातील 13 लाख 73 हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली.
घाटकोपर येथील रहिवासी योगेश शिंदे (41) हे कुटुंबासह गाडीने रत्नागिरीहून मुंबईला परतत होते. शिंदे कुटुंबीय कल्ले गाव येथील गो ग्रीन हॉटेलमध्ये जेवण्यासाठी थांबले. शिंदे यांनी गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभी केली. याच कालावधीत चोरट्याने शिंदे यांच्या गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेल्या पर्समधील 10 तोळ्यांचे मंगळसूत्र, आठ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या आणि चार तोळ्यांची सोन्याची पाटली तसेच 50 हजारांची रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. जेवण झाल्यानंतर शिंदे कुटुंबीय दीड तासानंतर परतले असता, त्यांना गाडीच्या डाव्या बाजूची पाठीमागील काच फुटलेली दिसली. त्यांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवला.






