शासकीय दप्तर दिरंगाईचा प्रस्तावित रुग्णालयाला फटका

बांधकामाचा खर्च 17 कोटींनी वाढला; मंजुरीसाठी शासनाकडे 93 कोटींचा प्रस्ताव
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरणकरांसाठी प्रस्तावित असलेल्या 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला शासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे. 58 कोटी खर्चाचे काम आता 75 कोटी रुपयांवर पोचले आहे. त्यातच सिडकोने रुग्णालयासाठी दिलेल्या 5900 चौमी जागेपैकी 980 चौमी जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे कामगारांच्या वसाहतीसाठी आता येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या पडीक जमिनीचा वापर करावा लागणार आहे. यासाठी 17 कोटी रुपये खर्ची पडणार असुन या दोन्ही कामांच्या 93 कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पाठवला आहे.

देशाला व्यापारातून दरवर्षी सुमारे 80 हजार कोटी महसूल मिळवून देणाचे काम उरण तालुक्यातून होते. मात्र उरणकरांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाला 12 वर्षात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारता आलेले नाही. उरण सामाजिक संस्थेच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर उरणकरांसाठी मल्टी स्पेशालिटी इस्पितळसाठी सिडकोने द्रोणागिरी नोडमधील बोकडवीरा येथे 5900 स्वेअर मीटर क्षेत्राचा भुखंड दिला आहे. या भुखंडाची 84 लाख किंमतही शासनाने सिडकोला अदा केली आहे. त्यानंतर सिडकोने इस्पितळसाठी दिलेल्या भुखंडाची पाहणी करुन दोन वर्षातच रुग्णालय उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सिडकोची घोषणा हवेतच विरली आहे.

?उरण परिसरातील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा नफा कमावतात. मात्र रुग्णालय उभारण्यासाठी अद्याप तरी छदामही दिला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. येथील प्रकल्पांनी सीएसआरमधून मदतीचा हात दिल्यास 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी इस्पितळ उभारणे सहज शक्य आहे.
शासनाने 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे. या रुग्णालयाच्या बांधकामांचा खर्च पाच वर्षांपूर्वी 58 कोटी होता. आता तो खर्च 75 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सुसज्ज, अद्यावत तळमजल्यासह पाच मजली इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. वसाहतीमध्ये वर्ग-1 ते वर्ग-4 मधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 48 सदनिका तयार करण्यात येणार आहेत.?

दोन्ही कामांच्या 93 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश पवार यांनी दिली.

Exit mobile version