। नागोठणे । वार्ताहर ।
भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या रोहा तालुक्यातील वांगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील वृक्षांना राख्या बांधून हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षांचे रक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली.
वांगणी हायस्कूलचे हरितसेना प्रमुख टिळक खाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे रोहा येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील, वनपाल दिलीप वाघे, वनपाल शंकर कराडे, वनरक्षक धिरेश थळकर, नंदिनी कडव, शाळेचे मुख्याध्यापक जयहिंद ठाकूर यांनी कौतुक केले आहे. पर्यावरण रक्षणाचे संस्कार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर केल्यास भविष्यात पर्यावरणविषयी आपुलकी निर्माण होईल, अशी भावना सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केली.
भारतात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शाळेच्या परिसरातील वांगणी, बाळसई, आमडोशी, गोडसई, पाटणसई, उनाठावाडी या प्रत्येक गावात 75 झाडे लावण्याचा संकल्प वांगणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला व या संकल्पाची पूर्ती करण्याची ग्वाहीदेखील दिली. यावेळी शाळेचे हरितसेना प्रमुख टिळक खाडे यांनी विद्यार्थ्यांना परिसंस्थेत वृक्षांचे स्थान व सजीव सृष्टीतील वृक्षांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.