। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान झोपडपट्टी भागात राहणार्या लोकांच्या झोपड्या ह्या काळानुसार पक्क्या स्वरूपात बांधलेल्या असून कड्यालगतच्या जमिनीवर भार वाढलेला आहे. काही ठिकाणी मुरुमाच्या मातीच्या जुन्या ढिगार्यावरसुध्दा घरे बांधलेली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीत या घरांना नगरपरिषदेच्या मार्फत पावसाळ्यात अन्य सुरक्षित स्थळी आपला मुक्काम करावा या आशयाच्या नोटीस बजावल्या जातात. अतिवृष्टीमुळे एखाद्या भागाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी संरक्षण भिंती उभारणे गरजेचे बनले आहे.
माथेरानमध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता साधारण पाच दशकापूर्वी इथे झोपडपट्टीची स्थापना झाली होती. त्यावेळी मिळेल त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणार्या भूमिपुत्रांनी आपल्या झोपड्या उभारून कुटुंबासह राहू लागले होते. परंतु मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणी झोपडपट्टीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले असून कड्यालगतसुध्दा अत्यंत धोकादायक ठिकाणी परिसरातून व्यवसायासाठी आलेल्या लोकांनी राजकीय वरदहस्ताने जंगले नष्ट करून आता कायमस्वरूपी झोपड्या अर्थातच बांधून वास्तव्य करत आहेत.झोपडपट्टीचा पसारा इतका वाढला आहे की लोकांनी गल्लीबोळे सुध्दा व्यापलेली असून अंत्ययात्रेला जाण्यासाठी जागा शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे आपसूकच त्या त्या भागात अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे.
आपल्या पक्षाला मते मिळावीत यासाठी इथे नव्याने वास्तव्यास आलेल्या लोकांची अन्य ठिकाणी मतदार यादीत नावे असतानासुध्दा इथल्या मतदार यादीत काही राजकीय पक्षांच्या मंडळींनी नावे नोंदवली असल्याचे बोलले जात आहे. शेवटी भारतीय नागरिकाला देशात कुठेही व्यवसाय आणि वास्तव्य करता येऊ शकते हे जरी खरे असले तरीसुद्धा या छोट्याशा गावात सद्यस्थितीत स्थानिक भूमिपुत्र गाव सोडून अन्य ठिकाणी वास्तव्यास जात असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे कारण परिसरातून आलेल्या अन्य राज्यातील लोकांनी आपले पाय घट्ट रोवले आहेत.
मागील काळात आमदार निधीतून काही भागात संरक्षण भिंती उभारल्या गेल्या आहेत, तर काहींनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात नगरपरिषदेच्या माध्यमातून संरक्षण भिंती स्वतःच्या वास्तूच्या संरक्षणासाठी बांधलेल्या आहेत. त्याच धर्तीवर येथील धोकादायक घरांच्या संरक्षणासाठी सुरक्षा कवच म्हणून आरसीसी बांधकामामध्ये भिंत उभारल्यास लोकांना संरक्षण मिळू शकते.