मिठेखारच्या येथे संरक्षक भिंत बांधण्याच्या दुर्लक्षामुळे गरिब महिलेचा बळी
| अलिबाग | प्रतिनिधी |
दरडप्रवण क्षेत्रात नसतानाही मुरूड तालुक्यातील भोईघर येथे पाच कोटी रुपयांची संरक्षक भिंत बांधण्यात आली. धनदांडग्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत तातडीने बांधण्यात आली. मात्र, दरडप्रवण क्षेत्र असलेल्या मिठेखारची संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करूनही ही भिंत बांधण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. प्रशासन व आमदाराच्या दुर्लक्षामुळे अखेर दरड कोसळून वयोवृध्द महिलेचा नाहक बळी गेला. त्यामुळे आमदार दळवी यांच्या भुमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
भोईघर येथील विलोभनीय समुद्र किनाऱ्याच्या पार्श्वभुमीवर धनदांडग्यांनी त्यांच्या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यामध्ये काही लोकप्रतिनीधींच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. दरडीसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाकडून संरक्षक भिंतींची कामे केली जातात. मात्र, दरडप्रणव क्षेत्रात भोईघरचा समावेश नाही. तरी देखील प्रशासनाने तत्परतेने 5 कोटीची संरक्षक भिंत का बांधली? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी उपस्थित केला आहे.
मुरूड तालुक्यातील भोइघर किनारपट्टीवर संरक्षक भिंतींचे तब्बल 5 कोटी रुपयांचे काम झाले. मात्र, हे काम स्थानिक धनदांडग्यांच्या मालमत्तांच्या रक्षणासाठी केल्याच्या आरोपांनी ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे. दूसरीकडे, त्याच तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रात असलेल्या मिठेखार गावामध्ये दरड कोसळून दुर्दैवाने एका महिलेला जीव गमवावा लागला आहे. संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाकडे करण्यात आली. ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनंतरही येथे संरक्षक भिंत उभारली गेली नाही, याकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले.
भोईघर भागातील किनारी संरक्षणासाठी शासनाने कोट्यावधी रुपये मंजूर केले. मात्र, खरोखरच लोकांचे प्राण आणि उपजीविका धोक्यात असलेल्या भागांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी, मिठेखार येथे निसर्गकोपाचा बळी एका गरीब कुटूंबाला दयावा लागला आहे. या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून गावकरी आक्रोश व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्यावर तीव्र टीका होत आहे. सामान्यांसाठी न्याय्य धोरण राबवून धोरणात्मक कामे केली पाहिजेत, अन्यथा ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोर जावे लागेल असा देत मिठेखार परिसरात संरक्षक भिंतीचे काम तातडीने हाती घेण्याची मागणी केली करण्यात आली आहे.
आमदारांच्या पत्नीची कबुली
दोन वर्षापुर्वीदेखील या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती. त्यावेळी देखील आमदारांच्या पत्नीने गावाची पाहणी केली असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. असे असताना आमदारांनी तात्काळ यावर का उपाययोजना केली नाही?असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून प्रशासनासह आमदारांनीही नागरिकांच्या जीवशी खेळ केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच हा प्रश्न दोन वर्षे सोडविण्यास आमदार निष्क्रिय ठरले आहेत.
