महागाईविरोधात नवी मुंबईत आंदोलन

सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजन; खासदार सुप्रिया सुळे करणार नेतृत्व

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि महाराष्ट्रातील ढासळती कायदा-सुव्यवस्था याविरोधात बुधवारी (दि.3) सकाळी 10.00 वाजता नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे आंदोलन-मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे या करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार तसेच पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांवर या दरवाढीचा मोठा परिणाम झाला असून, केंद्र सरकार व राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरिता व या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन-मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले की, इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबे, शेतकरी, कामगार, छोटे व्यावसायिक आणि युवक यांचे जगणे अधिक कठीण झाले आहे. त्याचवेळी बेरोजगारीची समस्या गंभीर बनत चालली असून, महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याबाबत अधिक बोलताना महेश तपासे पुढे म्हणाले की, देशातील सर्वसामान्य नागरिकांना चारही बाजूंनी पिळवणूक सहन करावी लागत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या दरातील प्रत्येक वाढ थेट नागरिकांच्या घरगुती अर्थसंकल्पावर घाव घालते आणि जीवनावश्यक खर्च आणखी वाढवते. एकीकडे नागरिक आर्थिक संकटाशी झुंज देत असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र जनतेच्या वास्तव समस्यांपासून दूर असल्याचे दिसून येत आहे. वाढती बेरोजगारी आणि वाढता गुन्हेगारीचा आलेख यामुळे जनतेतील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. हा मोर्चा म्हणजे दुर्लक्षित, आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे त्रस्त झालेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे, असेही ते म्हणाले.

या आंदोलनात पक्षाचे हजारो कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, कामगार, वाहतूक व्यवसायिक, छोटे उद्योजक तसेच सर्व जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन या लोकशाही आंदोलनाला बळ देणार आहेत. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणणे, महागाई रोखणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version