| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील आरटीओ परिसरात “एडीसी“ नावाखाली कथितपणे सुरू असलेल्या अनधिकृत दलाली, नागरिकांची दिशाभूल आणि आर्थिक गैरव्यवहारांविरोधात दि.19 ऑगस्ट रोजी खारघर येथील सेक्टर-36 मधील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल यांनी दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणी प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी, निवेदने आणि स्मरणपत्रे सादर करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई अथवा समाधानकारक अहवाल न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आरटीओ कार्यालयातील कामकाज पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि दलालमुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात
आला आहे.
प्रमुख मागण्या
“एडीसी“ नावाखाली सुरू असलेल्या अनधिकृत दलालीची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आरटीओ कार्यालयातील सर्व कामकाज पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे, सर्व कक्षांमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच नागरिकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी.
