सरकारविरोधात काळ्या फिती लावून आंदोलन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. जिल्हा परिषद कार्यालयासमोर गुरुवारी (दि.01) सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटना जिल्हा शाखा रायगडचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सचिव संतोष साळावकर, कोषाध्यक्ष मेघा म्हात्रे आदी पदाधिकारी, सभासद, वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत नियुक्त करण्यात आलेल्या सर्वच कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शनचा लाभ तात्काळ मिळावा, तसेच इतर अन्य प्रमुख मागण्या मान्य करण्याकरिता गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद कर्मचारी शासन दरबारी लढा देत आहेत. फक्त या कर्मचार्‍यांना आश्‍वासने दिली जात आहे. त्याची अंमलबजावणी करण्यास सरकार उदासीन ठरत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी काळ्याफिती लावून शासन विरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आले. अलिबागमधील कुंटेबाग येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वेगवेगळ्या विभागातील शिपाई, क्लार्क, कक्ष अधिकारी व अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, कार्यालयात दिवसभर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version