शेकापचे झाड लावून आंदोलन

। पनवेल । वार्ताहर ।

निवडणुकीचे वेध लागताच पनवेल महानगर पालिकेने करोडो रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्याचा तगदा सुरु केला आहे. मात्र, अनेक वर्ष रस्त्यांची होत असलेली भयानक अवस्था पाहायला पालिकेच्या कोणत्याही अधिकार्‍याला वेळ मिळाला नाही. येथील खांदा वसाहतीच्या मुख्य खड्डेमय रस्त्यावरूनच दरवर्षी गणरायाचे आगमन व विसर्जन होत आले आहे. तसेच, या खड्ड्यात अनेक दुचाकींचा अपघात झाला असून चालकांना गंभीर त्रासांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे खांदा वसाहतीच्या आजू बाजूच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. याकरीता खांदा वसाहतीतील शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी खांदा वसाहतीतील मुख्य रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी पनवेल पालिकेसोबत पत्र व्यवहार केला होता. तसेच, हा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त झाला नाहीतर याच खड्ड्यात झाड लावून आंदोलन करण्याचा इशारा पालिकेला देण्यात आला होता.

दरम्यान, पनवेल खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेकडून करोडोंचा खर्च करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील येथील मुख्य रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे. यामुळे मंगळवारी (दि.15) शेकापच्यावतीने खांदा वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे तसेच माजी उप नगराध्यक्ष गणेश पाटील व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Exit mobile version