पिल्लई कॉलेजविरोधात प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीतील पिल्लई कॅम्पसचे बांधकाम होत असताना आंबिवलीतर्फे तुंगारतन गावकर्‍यांना गावातील सर्व मुलांना तसेच परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना मोफत शिक्षण देऊ असे शाळा प्रशासनाने सांगितले होते. परंतु, कित्येक वर्षे होऊनही कोणत्याही प्रकल्पग्रस्त मुलांना शिक्षणात मोफत सामावून न घेतल्याने स्थानिकांत संतापाचे वातावरण होते. ही मागणी पूर्ण करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना वासांबे विभाग अध्यक्ष विनोद शिंदे यांच्यामार्फत मागील महिन्याभरापासून पाठपुरावा सुरु होता. कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने पिल्लई शाळा व्यवस्थापन विरोधात शाळेच्या काही अंतरावर सोमवार, दि. 8 जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.

या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संघटना, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. पिल्लई व्यवस्थापन जोपर्यंत परिसरातील मुलांना न्याय देत नाही, तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन सुरुच राहील, असा विश्‍वास आंदोलनकर्त्यांनी बोलताना दाखविला.

Exit mobile version