रस्त्यावरील खड्ड्यात कागदी होड्या सोडत आंदोलन

कामोठे कॉलनी फोरम तर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

रस्त्यावर पडलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडत कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. या वेळी निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामा बाबत पालिका प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारण्यात आला. तसेच गणेशोत्सवापूर्वी पालिकेच्या वतीने जर रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही, तर कामोठे कॉलनी फोरमतर्फे भव्य आंदोलन उभारण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेली नालेसफाईची काम अपयशी ठरलेली असून कामोठे शहरातील बहुतांश भागात पावसाचे पाणी साचलेले आहेत, यासाठी पालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ज्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. अशा सर्व भागांची तातडीने नालेसफाई करून घेण्यात यावी. तसेच शहरातील काही भागात फुटपाथ वरती अतिक्रमण झालेले असून, नागरिकांना चालायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही, असे अतिक्रमित फूटपाथ पालिकेने कारवाई करत नागरिकांसाठी त्वरित मोकळे करून देण्यात यावे. शहरातील रस्ते असतील ,नालेसफाई असेल किंवा फुटपाथ असतील अशा कोणत्याही समस्यांवरती पालिकेच्या वतीने ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ठेकेदाराकडून निष्कृष्ट काम केले जात असूनही पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. केवळ जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. एकीकडे पालिका मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांवर दबाव टाकत असून, नागरिकांकडून कर रुपी जमा झालेला पैसा पालिका प्रशासन कशाप्रकारे उधळत आहे असा आरोप कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने करण्यात आला. या वेळी कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, सचिव बापू साळुंखे, युवा अध्यक्ष राघव गट्टेवार अणि वैद्यकीय सेल उप प्रमुख पंकज पोडूतवार उपस्थित होते.

Exit mobile version