उरणला महागाई विरोधात मोर्चा

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण शहरात चार फाटा ते गांधी चौक असा रविवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या महागाई विरोधाच्या मोर्चात रोजी रोटी दे न सके ओ सरकार निकम्मी है, ओ सरकार बदलनी है, व ओ सरकार बदलनी है म्हणत सरकारच्या सर्वसामान्य जनता विरोधी धोरणांवर हल्ला केला.

वाढती प्रचंड महागाई कमी करा, गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ मागे घ्या, लाल बावटे की जय आदी जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा गांधी चौकात आल्यानंतर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी कामगार नेते कॉ. भूषण पाटील, हेमलता पाटील, संजय ठाकूर यांची यथोचित भाषणे झाली. देशात बारा वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान मोदींची सत्ता आहे. या सत्ता काळात वाढत्या महागाई, बेरोजगारी, पेपर फुटीने दरवर्षी विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचा त्याचप्रमाणे यामुळे सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, मागास आणि आदिवासी यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारी धोरणे राबविणे सुरू आहे. 2014 ला जनतेला बहुत हुई महंगाई की मार चा नारा देत भ्रष्ट काँग्रेसपासून सुटका करीत अच्छे दिन आणण्याचा वादा केला होता. प्रत्यक्षात मात्र या बारा वर्षात गॅस सिलेंडर 450 वरून 950 रुपयांवर म्हणजे दुपटीने वाढला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या महागाईत थेट वाढ करणाऱ्या पेट्रोल डिझेलने शंभरी पार केली आहे. शेतकऱ्यांना शेतीवरून हुसकावून लावून भूमिहीन यामुळे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक भूमीपुत्र नष्ट करण्याचा डाव आखला जात आहे. या सर्व परिस्थितीचा समाचार यावेळी घेण्यात आला. या मोर्चात महिला, कामगार तसेच तरुणही सहभागी झाले होते. मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयु कामगार संघटना, जनवादी महिला संघटना, डीआयएफआय युवक संघटना, किसान सभा या संघटना सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version