रेल्वे कारशेडच्या भरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड परिसरात सुरू असलेल्या एमआरव्हीसीच्या रेल्वे कारशेड प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका निर्माण झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. “कारशेडचा भराव, पुराचा कहर” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
भिवपुरी रोड स्थानकाजवळ सुमारे सहा फूट उंचीचा भराव टाकण्यात आल्याने बेंडसे, वावे, भातगाव, बार्डी आणि कोषाणेवाडी या गावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. भरावामुळे उल्हास नदीच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून पाणी गावांमध्ये शिरू शकते, असा दावा आंदोलकांनी केला.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी तहसीलदार धनंजय जाधव, पाटबंधारे विभागाचे संदेश मेंगाळ, रेल्वे अधिकारी गणेश दांडे तसेच उपसभापती चित्रा ठाकरे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान रेल्वे प्रशासनाने तज्ज्ञांच्या अहवालानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येतील तसेच परिस्थितीचे संपूर्ण मूल्यमापन होईपर्यंत कारशेडचे काम तात्पुरते स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या भरावासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन सुरू असल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला. पर्यावरण, शेती आणि मानवी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
