महसूल कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने

काम बंदचा सर्वसामान्यांना फटका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या आंदोलनात आज आठ दिवसानंतर आक्रमक झालेले जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जाऊन थेट प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. विशेष म्हणजे दरवेळी आंदोलकांना 100 मीटर अंतरावर रोखणार्‍या पोलिसांनी या आंदोलकांना कार्यालयाच्या गेटबाहेर देखील अडवले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि कर्मचार्‍यांना वेगळा न्याय असे मत व्यक्त होत होते. आठ दिवसांपासून महसूली काम ठप्प असल्याने जिल्हाधिकारी आणि तहसिल कार्यालयात येणार्‍या सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत.

राज्य महसून कर्मचार्‍यांचे गेल्या आठ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरु आहे. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी शासनाकडे पाठपुरावा देखील करीत आहेत. मात्र शासनाकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. आपल्या आंदोलनाची आठ दिवसात दखल घेतली न गेल्याने नाराज कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापरिसरातील हिराकोट तलावावर गोळा होऊन एक छोटी सभा घेण्यात आली. ही सभा झाल्यानंतर जमलेले शेकडो कर्मचारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसले. नेहमी पोलिस प्रशासनाकडून आवाराच्या बाहेरच आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतो. यावेळी मात्र कोणत्याही अडथळ्याविनाच हे आंदोलक थेट गेटमधून कार्यालयाच्या प्रवेशद्वारावार पोहचले. तीथे सर्वांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. कार्यालयाच्या आवारातच जोरदार घोषणाबाजी होत असल्याने सर्व सामान्य जनतेतून आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, सर्वसामान्य आंदोलकांना एक न्याय आणि कर्मचार्‍यांना वेगळा न्याय का असा सवाल जनतेतून केला जात आहे.

पत्रकारांवर काढला राग
हिराकोट तलावाजवळ सुरु असलेल्या सभेत पनवेल येथील एका कर्मचार्‍यांनी आपला राग थेट पत्रकारांवर काढला. त्याने म्हटले की, उद्याच्या वर्तमानपत्र, टिव्हीवर जर आमच्या बातम्या दिसल्या नाही तर पत्रकार झोपेत असल्याचे किंवा झोपेचे सोंग घेत असल्याचे आम्ही समजू. या वक्तव्यामुळे पत्रकारांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष केतन भगत यांनी त्वरीत संबंधीत कर्मचारी पदाधिकार्‍याला समज देत माफी मागण्यास सांगितले.

Exit mobile version