। खोपोली/ कर्जत/आगरदांडा । प्रतिनिधी ।
दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील शेकडो महसूल कर्मचारी आज सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील, तालुक्यातील महसूल विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
सर्वसामान्य शेतकर्याला फटका
खालापूर तहसीलदार कार्यालयातील महसूल कर्मचार्यांच्या बेमुदत संपामुळे तहसील कार्यालयात विविध कामानिमित्ताने आलेल्या शेतकर्यांना रिकामेच घरी परतावे लागल्याने अनेकांनी आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली असली तरी हेच लोक शासनाने या कर्मचार्यांचे म्हणणे योग्य वेळी एकले असते तर आजचे आंदोलन झाले नसते आणि पर्यायाने आजच्या दिवसाचे काम करता आले असते अश्या आंदोलन करणार्या महसूल कर्मचार्यांच्या बाजूने प्रतिक्रिया एकायला मिळत होत्या. आंदोलकांनी शासनाकडे मागील काही दिवसापासून पुढील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी तगादा लावला आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर महसूल कर्मचारी बेमुदत आंदोलनास सहभागी झाले.

कर्जत उपविभाग महसूल विभाग सहभागी
राज्यातील महसूल विभाग आणि जिल्ह्यातील महसूल संघटनांनी 21 मार्च 2022 पासून निदर्शने, काळ्या फिती लावून काम, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशी आंदोलने केली आहेत. तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता महसूल कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचे हत्यार उपसले आहे. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने संपात कर्जत उपविभागातील कोतवाल 17, शिपाई 2, महसूल सहायक 14, अव्वल कारकून 09, नायब तहसीलदार (पदोन्नत) 3,पुरवठा निरीक्षक 1, मंडळ अधिकारी 3 असे एकूण 49 महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत.

मुरुडमध्ये कामकाज ठप्प
महसूल कर्मचार्यांनी सोमवारी आपल्या प्रलंबित राहिलेल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. मुरुड तालुक्यातील महसूल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालयाच्या विविध शाखेमधील महसूल विभागाचे काम ठप्प झाले आहे. तहसीलदार कार्यालयासह तालाठी कार्यालयात शुकशुकाट असून कर्मचार्यांनी आंदोलनात व बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर कर्मचार्यांनी धरणे आंदोलन करत शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहेत. राज्य कर्मचारी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष रिमा कदम, सचिन राजे, ज्ञानोबा तिथे, आरती पैर अव्वल कारकून, मंडळ अधीकारी कर्मचार्यांनी हा आंदोलनात व बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.