बिझनेस फोरमचे उदघाटन
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रविवार 3 एप्रील रोजी आदर्श नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात बिझनेस फोरमचा शुभारंभ झाला. वेळोवेळी कालानुरुप परिवर्तन घडवून आणणारे व्यवसायच टिकतात आणि वृद्धिंगत होतात असे प्रतिपादन विख्यात बिझनेस गुरु कुंदन गुरव यांनी अलिबाग मध्ये व्यावसायिकांच्या मार्गदर्शनासाठी लायन्स क्लब अलिबागच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेल्या बिझनेस फोरमच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केले.
लायन्स क्लब अलिबाग तर्फे बिझनेस फोरम सुरु करण्यात आला आहे. व्यावसायिकांना मार्गदर्शनपर दर महिन्याला एका बिझनेस गुरुचे व्याख्यान आणि एका यशस्वी व्यावसायिकाची मुलाखत असे या फोरमचे स्वरुप असणार आहे. अलिबाग जवळच्या मापगावचे मुळ रहिवासी कुंदन गुरव हे व्यवसायातील परिवर्तनासाठी मार्गदर्शक म्हणून नावलौकिक असलेल्या ट्रान्सगॅनायझेशन या संस्थेचे संचालक आहेत.
शुन्यातून स्वतःचे उद्योगविश्व उभे करणारे इनस्टील इंजिनिअरिंग प्रा.लिचे व्यवस्थापकीय संचालक राजू जगताप यांची मुलाखत प्रविण सरनाईक घेतली. 125 लोकांना रोजगार देणार्या मोठ्या कंपनीपर्यंतच्या आव्हानात्मक प्रवासाचा लेखाजोखा राजू जगताप यांनी मुलाखतीत उलगडला.या कार्यक्रमाला आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील यांसह लायन्स सदस्य व प्रतिष्ठीत व्यावसायिक उपस्थित होते.